Home » ताज्या » बदनामीच्या भीती : सासरच्यांनी जावायाचा मृतदेह फेकला !

बदनामीच्या भीती : सासरच्यांनी जावायाचा मृतदेह फेकला !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाल येथे संशयास्पदरित्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्या तरुणाने आत्म्हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. जावायाने सासूरवाडीला आत्महत्या केल्यामुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी सासरच्यांनी जावायाचा मृतदेह सुकी नदीपात्रात टाकून विटंबना केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली बाजूस असलेल्या नदीपात्रात सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) याचा दि. २६ मार्च रोजी मृतदेह मिळून आला होता. त्याच्या गळ्यावर व्रण असल्यामुळे त्या तरुणाच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे पोलीसांपुढे आव्हान उभे ठाकले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत इंगळे, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ जगदीश पाटील, मुकेश मेढे, अतुल गाडी लोहार, प्रमोद पाटील, सचिन घुगे, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मयताची सासरवाडी पिंपरूड व पाल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी तपासात सुरेश बारीला याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

चौकशीत गिरसिंग बारेला यांनी सांगितले की, ते पाल येथून पिंपरकुंड कडे जात असताना नवाड जवळील अंजनाच्या झाडावर हरलाल राजाराम बारेला यांच्या जावई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी ही घटना त्यांच्या नातेवाईकांना सांगताच आपली समाजात बदनामी होईल, या भितीपोटी त्यांनी मृतदेह पाल येथील सुकी नदीपात्रात आणून टाकल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी मयताची पत्नी चंपीबाई बारेला यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गिरसिंग किर्ता बारेला, तेरसिंग कजम्या बारेला, सिताराम कजम्या बारेला, संजय रेजला बारेला, रेजला गोटा बारेला, धीचल सिताराम बारेला व बारसिंग नावडा बारेला सर्व रा. नवाड भाग, पिंपरकुंड शेतशिवार, ता. रावेर यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *