पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील धनकवडी परिसरात हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसगळती होउन लागलेल्या आगीत 24 वर्षीय कामगार ठार झाला आहे. आगीची घटना रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास धनकवडी के के मार्केट जवळ साईबा हॉटेलमध्ये घडली आहे. संतोष (वय २४) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील के के मार्केट नजीक साईबा हॉटेल असून, त्याठिकाणी ३० मार्चला संध्याकाळी सव्वा चारला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. वर्दि मिळताच काञज व गंगाधाम अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी धाव घेत हॉटेलमध्ये अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. पाण्याचा मारा करत कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तेथील आग पुर्ण विझवत धोका दुर केला.
शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही नुकसान झाले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतरञ पसरली नाही. आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळाले असून, दुध तापवित असताना वायूगळती झाल्यामुळे सिलेंडरला आग लागली. त्याचवेळी संतोषला हॉटेलबाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हॉटेलमध्ये एकूण आठपैकी तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. आगीमध्ये कामगाराचा मृत्यु झाला आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्टेशन ऑफीसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांनी प्राधान्य दिले.



