भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील विल्हाळे शिवारातील डीपीवर काम करताना एका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला शॉक लागला. ही घटना दि. ३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला विल्हाळे शिवारात तलावाजवळ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीवर काम करण्याचे आदेश दिले होते. त्याकरीता विजपुरवठा खंडीत केला होता, परंतु दुसऱ्या डिपीवरून उलट सप्लाय सुरू झाल्याने काम करणाऱ्या शेखर भारंबे या कर्मचाऱ्याला जोरदार विद्युत शॉक बसला. त्यामुळे तो डीपीवरुन खाली कोसळून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला वरणगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. हे काम हे गोलू पाटील व सागर पाटील या ठेकेदारा मार्फत करण्यात येत आहे.
ही घटना वीज अधिकारी व कर्मर्चायांनी योग्य पद्धतीने वीजपुरवठा बंद न करता त्याला कामावर पाठवले होते. तसेच सुरक्षेचे कोणतेही उपकरण त्यांच्या कडे नसल्याने जबर शॉक बसला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप होत असून, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेबाबत विज वितरण अभियंता प्रियंका कुलकर्णी यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रारी अर्ज दिला आहे. यावेळी अभियंता विनायक जामकर यांनी शेतकऱ्याने दुसऱ्या शिवारातून विजपुरवठा सुरू केल्याने प्रकार घडल्याचे सांगितले आहे.



