Home » राष्ट्रीय » मध्यस्थी करायला गेलेल्या रिक्षाचालकाची हत्या !

मध्यस्थी करायला गेलेल्या रिक्षाचालकाची हत्या !

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिक शहरातील श्रमिकनगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीवर टोळक्याने हल्ला केला. हा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या रिक्षा चालकावर टोळक्याने फायटर व कोत्याने वार केल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला.

प्रकाश मधुकर सूर्यवंशी (३९, रा. कडेपठार चौक, स्वामी नरेंद्र छाया हाईट्स, गंगासागर नगर, श्रमिकनगर, सातपूर) असे मध्यस्थी करणाऱ्या मृत रिक्षा चालकाने नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी चाैघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादीनुसार, प्रकाश सूर्यवंशी हे १० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.१५ वाजेच्या सुमारास अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये गणेश उत्तम पाटील यांच्यासोबत रिक्षात गप्पा मारत बसले होते. यावेळी संशयित आरोपी संघर्ष मोरे, प्रेम संदीप जाधव, प्रमोद भगत (सर्व रा. धर्माजी कॉलनी) व भावेश आहिरे (रा. श्रमिकनगर) यांनी अचानक त्याठिकाणी येत शिवीगाळ करून गणेश पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रकाश सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करीत, ‘वाद कशाला घालता’ असे म्हटले. त्यावरून राग आलेल्या संशयितांनी प्रकाश सूर्यवंशी यांना घेरून त्यांच्यावर कोयत्याने वार केले तसेच फायटरने बेदम मारहाण केली तर, गणेश पाटील याने पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सूर्यवंशी यांना त्यांची पत्नी सुवर्णा यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना १२ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुवर्णा सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

प्रकाश सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, वडील असा मोठा परिवार असून, त्या सर्वांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सूर्यवंशी यांच्यावर होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबांचा विशेषत: तीन मुलींचा आधार गेल्याने, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी जलद तपास करून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नातेवाइकांकडून केली जात आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *