Home » राष्ट्रीय » ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान !

ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात कालपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे, यात कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे, असे विधान उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी देखील मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे वक्तव्य केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. फक्त मला वाटते की माध्यमे त्यावर जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसले. एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या गावी दरेगाव येथे आहेत. यावेळी त्यांना दोघांचे युतीवर प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे भडकल्याचे दिसले. काय रे तू म्हणत त्यांनी माईक दूर केला आणि प्रश्नाचे उत्तर न देताच निघून गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी स्पष्ट दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचे घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, आमच्यातली भांडणे छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. मी लार्जर पिक्चर पाहतो, असे म्हणत त्यांनी भविष्यातील युतीचा पर्याय खुला आहे, असे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील माझ्याकडून भांडण कधीच नव्हते, असे म्हणत महाराष्ट्र द्रोह्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे, जेवायला ज्यायचे, त्यांच्यासाठी प्रचार करायचे थांबवले तर आम्हीही युती करायला तयार आहोत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *