जळगाव : प्रतिनिधी
रामनवनीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादातून मित्राचा वाढदिवस साजरा करतांना महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २५, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा हुडको) या तरुणावर गोळीबार झाला. ही गुरुवार दि. २४ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मिनाताई ठाकरे मार्केटजवळील सेंट जोसेफ शाळेजवळ घडली. जखमी तरुणाच्या कमरेजवळ बुलेट अडकली असून त्यावर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हु-डको परिसरातील प्रबुद्ध नगरात राहणारा महेंद्र उर्फ दादू सपकाळे याचा भूषण मनोज अहिरे याचा दि. २४ रोजी वाढदिवस होता. शहरातील मिनाताई ठाकरे मार्केट जवळील सेंट जोसेफ शाळेजवळ महेंद्र हा त्यांचा मित्र सचिन चौधरी याच्यासोबत वाढदिवस साजरा करीत होते. यावेळी रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत झालेल्या वादाची खुन्नस ठेवत चार ते पाच जण त्याठिकाणी आले. त्यांनी महेंद्रसह त्याच्या मित्रांना मारहाण करीत गावठी कट्टूयातून गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी महेंद्र याच्या कमरेखाली लागली असून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणाहून पोलिसांनी रिकामे काडतूसाची पुंगळी जप्त केली आहे. तसेच ही गोळीबाराची घटना शाळेच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जिल्हापेठचे सपोनि संतोष चव्हाण, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे, गुन्हे शोध पथकातील जितेंद्र राठोड, हेमंत कळसक र यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.



