Home » राष्ट्रीय » अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा : भर कार्यक्रमात बोलून दाखविले !

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा : भर कार्यक्रमात बोलून दाखविले !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असतांना आता त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक वर्षांपासून त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही भावना वेळोवेळी सूचित केली आहे. उपमुख्यमंत्रिपदावर त्यांनी तब्बल सहावेवेळा विराजमान होत ऐक्याचा विक्रम केला असला, तरी अजूनही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ‘मुख्यमंत्री’ हा शब्द जोडलेला नाही. अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांनी केलेल्या विधानाची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य करताना आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या. पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजे, अशी आशा व्यक्त केली होती. राही भिडे यांच्या विधानाचा धागा पकडून अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले. राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी पुढे बोलताना राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास व्यक्त केला. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग कधीतरी जुळून येईल. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो योगही राज्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. सध्या त्यांची सहावी टर्म आहे. अजित पवार 2010 मध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त 80 तास उपमुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. अडीच वर्षे ते या पदावर होते. 2022 सालीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. यावेळी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *