जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. ही घटना जामनेर-पहूर रस्त्यावर बुधवार, दि. ३० रोजी रात्री घडली. काशीनाथ दामू पाटील (५२, रा. हिवरे दिगर, ता. जामनेर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते जामनेरहून पहूरकडे येत असताना सोनाळा फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले. रात्री एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.



