मुक्ताईनगर : प्रतिनिधी
महावितरणमधील कंत्राटी कामगार नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुईखेडा गावात घडली. नितेश हा कंत्राटदारामार्फत पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार झटका बसला. यामुळे तो पोलवरून खाली कोसळला. त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले आहेत. विद्युत प्रवाह बंद न करता काम सुरू करण्याची परवानगी देणे म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळ असल्याचे आरोप होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ रुग्णालय गाठून मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला धारेवर धरून, मयताच्या कुटुंबास मदत म्हणून १५ लाख रुपये मदतीची मागणी केली. यावर कंत्राटदाराने २ ते ३ दिवसात १० लाख रुपये आणि पुढील ५ ते ६ दिवसात ५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे. हितेश केवळ दीड महिन्यांपासूनच कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्या अकाली जाण्याने आई-वडील आणि भावासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



