यावल : प्रतिनिधी
शहरातील मेन रोडावर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले. मात्र, आत देखील चैनल गेट असल्याने चोरीचा हा त्यांचा प्रयत्न फसला. दरम्यान तेथून पुढे याच भागातील एका कुलूप बंद घराला देखील त्यांनी लक्ष केले. घराचे कुलूप तोडले मात्र घरात काहीच नव्हते. तर यापूर्वी याच मेन रोडावर एका दवाखान्यात अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली होती व आता या सरफा व्यावसायिकाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या प्रयत्नाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरात मेन रोडवर चावडीच्या पुढे लक्ष्मी ज्वेलर्स नामक नितीन दिनकर रणधीरे यांचे दुकान आहे. या दुकानाचे शटर चे कुलूप रविवारी पहाटेपूर्वी चार वाजेच्या सुमारास एका दुचाकी वर आलेल्या चार अज्ञात चोरट्याने तोडले. आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीचा क्रमांक एम. एच. १९ डी. एल. ९७५७ असा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला आहे. तर चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. येथे चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा या भागातील कांचन श्रीराम सराफ यांच्या घराकडे वळवला त्यांच्या घराला कुलूप होते. कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र घरामध्ये चोरी करणे योग्य काहीच नव्हते म्हणून ते तिथून पसार झाले. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार निलेश चौधरी यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



