Home » राष्ट्रीय » चोरट्यांचा धुमाकूळ : दागिने लांबवत वृद्ध महिलेचा केला खून !

चोरट्यांचा धुमाकूळ : दागिने लांबवत वृद्ध महिलेचा केला खून !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील  वाडी गावाजवळील शेवाळे येथे एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथे एका उघडकीस आली आहे.  या घटनेत जनाबाई माहरु पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून पोबारा केला. या घटनेने पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शेवाळे येथील जनाबाई पाटील या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर, त्यांना आपली आई झोपलेल्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून डोक्याचे दोन तुकडे केले होते. तसेच, गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत आणि कानातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या ओरबाडून चोरट्यांनी वृद्ध महिलेला पलंगाखाली टाकून तिच्यावर अंथरूण पांघरूण टाकले होते.

या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉडने गावातच सुगावा काढल्याने, वृद्ध महिलेचा मारेकरी हा गावातीलच असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णराव पाटील बाहेरगावी गेल्याची खबर लागल्याने रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *