Home » जळगाव » मेहरूण तलावात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू !

मेहरूण तलावात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरूण तलावात दि.७ जून २०२५ रोजी रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय मोहम्मद नदीम शेख या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून, तब्बल दोन ते अडीच तासानंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम शेख हा काही मित्रांसह तलाव परिसरात गेला होता. पोहत असताना त्याचा श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र प्रशासनाची मदत पोहोचायला दोन तासांचा विलंब झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अखेर घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच नदीमचा मृतदेह सापडला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नदीमच्या नातेवाईकांसह मित्रांनी हंबरडा फोडला होता, तर काहींनी यंत्रणांच्या दिरंगाईवर संतप्त शब्दांत नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर मेहरूण तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तलावाजवळ योग्य सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलकांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *