सांगली : वृत्तसंस्था
पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांना आता सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, सांगलीत पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने सासरच्यांकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा सुकुमार राजगे ( २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ऋतुजा हिचे २०२१ मध्ये नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या सुकुमारशी लग्न झाले होते. धक्कादायक म्हणजे, सुकुमार हा ख्रिश्चन धर्माचा आहेत हे ऋतुजा आणि तिच्या आई-वडिलांना लग्न होईपर्यंत माहिती नव्हते.लग्नानंतर ऋतुजाला वटपौर्णिमा, दिवळी साजरी करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर तिला थेट चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी येण्याचे सांगण्यात आले. यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकण्यात आला. शेवटी या छळाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचे आरोप तिचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
ऋतुजा ही सात महिन्यांची गर्भवती होती. मात्र, सासरच्यांकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याने सांगलीत हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसात ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.



