मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची मागणी केली. या भेटीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले की, “जनसुरक्षा विधेयक विरोधकांना विश्वासात न घेता आणि कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आले. आमच्या सूचना डावलून हे बिल संमत झाले, यामागे सरकारची राजकीय नीयत आहे.” ते पुढे म्हणाले, “हे विधेयक म्हणजे जनतेचे नव्हे तर सरकारचे संरक्षण करणारे विधेयक आहे. राज्यात आधीच मकोका व एपीडी सारखे कडक कायदे अस्तित्वात असताना, नवीन कायद्याची गरजच काय होती?”
वडेट्टीवारांनी राज्यपालांसमोर स्पष्टपणे मांडले की, “हा कायदा सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे आणि त्यामुळेच हे विधेयक राज्यपालांनी परत पाठवावे, पुनर्विचार व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे.” विधानभवनात घडलेल्या हाणामारी प्रकरणावरही त्यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याचे सांगितले. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. गुन्हेगार सत्ताधाऱ्यांच्या सोबत खुलेआम फिरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. पुण्यात एका गुंडाकडून पोलिस ठाण्यात केलेल्या राड्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, “देशातच नव्हे, तर जगभरात या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे.” ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे सत्तेची मस्ती आहे. गुन्हेगारांना विधिमंडळात प्रवेश कसा मिळतो? पडळकरांनी इशारा दिल्यानंतरच नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झाला. ही सगळी योजना आधीपासून होती.” “हे सरकार आता कायद्याने चालत नाही, तर सत्तेच्या जोरावरच राज्य करत आहे,” असा थेट आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.



