जळगाव : प्रतिनिधी
जन्म मृत्यू नोंदणी विभगात पत्नीच्या जागेवर पतीला काम करण्याची मूभा दिल्याप्रकरणी डॉ. विजय घोलप यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल तीन सदस्यांच्या समितीने आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे डॉ. घोलप यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक महिला नोकरीला होती. सदर महिलेच्या जागेवर त्या महिलेचा पती काम करत असल्याचे आढळून आले होते. शासकीय कार्यालयात एका बाहेरील व्यक्तीकडून काम करून घेतले जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशाने तीन सदस्य असलेली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीकडून चौकशी करण्यात आली असून कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार होता. परंतु मनपातील काही अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात डॉ. घोलप यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे सात महिन्यांपासून समितीचा अहवाल काही ना काही कारण सांगून लांबणीवर टाकण्यात येत होता.
मात्र, डॉ. घोलप यांना पाठीशी घातले जात असल्यामुळे सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आक्रम झाले होते. तसेच माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत डॉ. घोलप यांच्यावर तातडीने कारवाई करा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी मोठ्या जनसमुदायासह तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यामुळे जन्म मृत्यू विभागाने तातडीने मंगळवारी डॉ. घोलपांचा अहवाल उपायुक्तांकडे पाठविला. त्यानंतर मनपाचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी बुधवारी दुपारी कारवाईचा अहवाल मनपा आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यावर आज गुरुवार रोजी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडून कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे



