Home » राष्ट्रीय » रम्मीमुळे कोकाटे बाहेर; दादांचे शिलेदार कृषी मंत्री

रम्मीमुळे कोकाटे बाहेर; दादांचे शिलेदार कृषी मंत्री

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आणि कृषी खात्यावर गंभीर प्रश्न असताना कोकाटे यांचा हा बेजबाबदारपणा जनतेला आणि विरोधकांना खटकला. यामुळे निर्माण झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे.

या निर्णयानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांचा रम्मीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मंत्र्यांचा असा वेळकाढूपणा अस्वीकार्य असल्याचा सूर विरोधकांनी लावला होता. या पार्श्वभूमीवर, सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेतले.

आता दत्तात्रय भरणे यांच्यासमोर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विशेषत: आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि कृषी क्षेत्रातील आव्हाने यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान आहे. तर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्यातून नव्या जबाबदारीला सामोरे जावे लागणार आहे. या खातेस्वप्नामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या संतापाला आणि विरोधकांच्या टीकेला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *