एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील पातरखेडा येथील आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांवर अजूनही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, यातील ४ विद्यार्थी अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास अजून वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या आश्रमशाळेच्या ४२ विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी गोवरची लागण झाल्याने त्यांना वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील ३२ विद्यार्थ्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांवर बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे यांच्यासह डॉ. गिरीश राणे उपचार करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जीएमसीत विद्यार्थ्यांच्या तब्येतीची पाहणी केली. यात काही उपचारासाठी बदल सुचवले असून, त्यानुसार बालकांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. सुरोसे यांनी सांगितले.



