Home » जळगाव » आनंद बॅटरी कंपनीतून चोरी : शिसे प्लेट्स, दोन आरोपीसह तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त !

आनंद बॅटरी कंपनीतून चोरी : शिसे प्लेट्स, दोन आरोपीसह तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘आनंद बॅटरी’ या कंपनीत घरफोडी करून सुमारे ९७,००० रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३२७ किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० ते १ ऑगस्ट सकाळी ८ वाजेच्या दरम्यान आनंद बॅटरी कंपनीत ही चोरी झाली. या कंपनीत बॅटरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३२५ किलो वजनाच्या शिसे धातूच्या प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. ५६१/२०२५ नुसार IPC कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे, किरण पाटील, नरेंद्र मोरे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली.

गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा तपास घेत असताना, चोरीचा मुख्य सूत्रधार मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा (रा. तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पोलिसांना विश्वासात घेऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर दुसरा आरोपी इम्रान सय्यद हारुण (रा. नशिराबाद, जळगाव) यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीस गेलेल्या एकूण ३२५ किलो शिसे प्लेट्सपैकी ३२७ किलो वजनाच्या १५ प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली २ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना दि. २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित आरोपी रहीम उर्फ बाबल्या रशिद खान आणि मेहमुद उर्फ चिनी शेख मोहम्मद यांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *