अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सडावण येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांबू लागवडीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणाचे आरएफओ मनोज बबनराव कापुरे, कर्मचारी नीलेश मोतीलाल चांदणे, कैलास भरत पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

यातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांना सडावण शिवारात त्यांच्या तीन नातेवाइकांसह बांबू लागवड करावयाची होती. तसेच फळझाड, वृक्षलागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ४ फाइल्स सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांच्याकडे दखल केल्या होत्या.
अमळनेर विभागाचा अतिरिक्त कार्यभार पारोळा विभागाचे आरएफओ मनोज कापुरे (५४) यांच्याकडे असल्याने २३ जुलै रोजी तक्रारदार त्यांना भेटले. बांबू लागवड करण्याबाबत चर्चा केली. अंतिम मंजुरीसाठी एकूण ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. ३६ हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारीची पडताळणी मंगळवारी केली असता मनोज कापुरे, नीलेश चांदणे (४५) यांनी लाचेची मागणी करून ही रक्कम कैलास पाटील (२७, मोरफळ, ता. पारोळा) याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी पंचांसमक्ष लाच रक्कम स्वीकारली. याप्रकरणात तिघाही लाचखोरांना पकडण्यात आले आहे.



