पाचोरा ; प्रतिनिधी
शहरातील महावितरण कंपनीच्या पाचोरा नं. २ कार्यालयातील सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (३८) याला शहरातील सोलर पॅनल व्यावसायिकाकडून २९ हजार रुपयांची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा नं. २ भागाचे सहायक अभियंता मोरे हे येथील सोलर प्लॅनर व्यावसायिकास फायलींवर सह्या करण्यासाठी वारंवार छळ करीत होते. कोणत्याही फाईलसाठी पैसे घेतल्याशिवाय ती पुढे न नेण्याचा त्यांचा प्रकार हा वारंवार सुरू होता. चालू असलेल्या तीन कामांसाठी ९ हजार आणि मागील २८ कामांसाठी ७० हजार, असे एकूण ७९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यामुळे व्यावसायिकाने १२ ऑगस्ट रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
७९ हजारपैकी २९ हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले. पाचोरा येथील विभागीय महावितरण कार्यालयात साक्षीदार समक्ष सापळा रचून मोरे यांनी २९ हजारांची रोकड स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांनी केली.



