नागपूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात डोंगरगाव तालुक्यात सकाळी 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत पादचारी भीसम दीनुराम शाहू (50, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) हे आपल्या मुलीला आयटीआयच्या परीक्षेसाठी डोंगरगाव येथे घेऊन आले होते. मुलगी प्रियंका भीसम शासकीय तंत्रनिकेतन, बर्डी येथे शिक्षण घेत असून मेघसाई खाजगी आयटीआय, डोंगरगाव येथे तिची परीक्षा होती. सकाळी तीला परीक्षागृहात सोडल्यानंतर भीसम शाहू रस्ता ओलांडत होते. रस्ता ओलांडत असताना कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हिंगणा परिसरात एका भीषण अपघातात पादचारीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भारती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकीचा अशोक लेलँड कंटेनर (क्रमांक MH40 CM 9800) भरधाव वेगाने येत असताना रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीस जोरदार धडक दिली. या धडकेत शाहू यांच्या पायाखाली थेट कंटेनरचे चाक गेले, तसेच डिव्हायडरवर डोके आपटल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की शाहू यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून संबंधित कंटेनर जप्त करण्यात आला आहे. अपघातानंतर काही काळ त्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
या अपघाताची नोंद हिंगणा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर अतिवेगात होता आणि पादचाऱ्याला वेळेत पाहून वाहन थांबवण्यात चालक अपयशी ठरला. पोलिस सध्या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींमधून तपास अधिक खोलवर सुरू आहे.



