Home » जळगाव » जळगावात मध्यरात्री थरार: रामेश्वर कॉलनीतील तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या!

जळगावात मध्यरात्री थरार: रामेश्वर कॉलनीतील तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या!

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विकी रमेश मोची या तरुणाची ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशालवर अचानक अज्ञातांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्याला गंभीर जखमी केलं आणि तो घटनास्थळीच कोसळला. अत्यवस्थ स्थितीत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. विशाल हा सोलर पॅनेलचे बेस बसवण्याचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *