जळगाव : प्रतिनिधी
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवारी केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केल्यानंतरही जळगाव जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्ज प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. त्यांच्याकडून कर्जाची रक्कम तत्काळ एकरकमी वसूल करण्यात यावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँक व्यवस्थापनाला दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री देवकर हे २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे त्याच काळात ते श्रीकृष्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचेही अध्यक्ष होते. बँक नियमन कायदा १९४९ चे कलम २० प्रमाणे कोणत्याही पदाधिकाऱ्यास संचालक अथवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही संस्थेस कर्ज मंजूर करण्यास प्रतिबंध आहे. तरीही देवकर यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या नावे तब्बल १० कोटी रूपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून उचलले. त्यामुळे देवकर यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या संस्थेच्या नावे कर्ज मंजूर करून घेतल्याची तक्रार झुरखेडा (ता.धरणगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी सहकार विभागाकडे केली होती.
त्या अनुषंगाने नाशिक येथील सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांना सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेवर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या मार्फत धुळे येथील जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी केली. त्या संदर्भात गेल्या महिन्यात सादर झालेल्या चौकशी अहवालातून माजी देवकर यांच्यावर जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्ज प्रकरणात पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच कर्जाची येणे बाकी असलेली रक्कम तत्काळ एकरकमी वसूल करण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्हा उपनिबंधकांनी जळगाव जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाला देवकरांकडून येणे बाकी असलेली कर्जाची रक्कम तातडीने एकरकमी वसूल करण्याचे आदेश काढले आहेत.



