जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीचा व त्याच्या वापराचा गांभीर्याने घेत, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पथकास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार २२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास भुसावळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना पहाटे १.५५ वाजता गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवरून भुसावळ शहरात गांजासारखा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, श्रे.पो.उप.निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, पो.हे.कॉ. संदीप चव्हाण, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी आणि पो.कॉ. राहुल वानखेडे यांचे पथक तयार करून कारवाईस रवाना केले. सदर पथकाने भुसावळ शहरात हॉटेल सुरुची इनसमोरील नॅशनल हायवेवरील नागपूरकडे जाणाऱ्या सव्र्व्हिस रोडवर सापळा रचला. या माहितीची खातरजमा करून पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाला देखील सहभागी करून घेण्यात आले. त्यामध्ये सहा. पो.नि. नितीन पाटील, पो.कॉ. हर्षल महाजन आणि पो.कॉ. परेश बिऱ्हाडे यांचा समावेश होता.
गोपनीय माहितीप्रमाणे काळ्या रंगाची सीबी शाईन मोटारसायकल घेऊन एक इसम तेथे येताना दिसला. त्याच्या पेट्रोल टाकीवर गोणीत काहीतरी ठेवलेले स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला शिताफीने पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून तब्बल १० किलो २७५ ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे २,०५,५०० रुपये किमतीचा, तसेच ७५,००० रुपयांची सीबी शाईन मोटारसायकल (MP-09-VM-4395) आणि १०,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २,९०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक विकास सातदिवे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम २०(ब), २२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाच्या सतर्कतेमुळे भुसावळ शहरात एक मोठी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर वचक बसेल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.



