जळगाव : प्रतिनिधी
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या मनिषा देवसिंग पावरा ( वय ६ वर्षे, मूळ रा. नागलवाडी, ता. चोपडा, ह.मु. गणेशपुरी, मेहरुण) या बालिकेला रिक्षाने धडक दिल्यामुळे ती ठार झाली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी गणेशपुरी भागात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी आई बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना मनिषा पावरा ही बालिका समोर खेळत होती. त्या वेळी एक रिक्षाचालक आला व त्याने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेकचा प्रयत्न केला. त्यात भरधाव रिक्षाची बालिकेला धडक बसून ती गंभीर जखमी झाली. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला. एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत आहे.



