Home » महाराष्ट्र » मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारांचे मोठे विधान !

मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले असून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (सीएसएमटी) आंदोलकांनी ठाण मांडलेले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

शरद पवार म्हणाले, 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकतो. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. असं शरद पवार यांनी म्हटले आहे. ते अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असंही शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. तर शेतीवर अवलंबून घटक वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींचा विचार करून शेती केली पाहिजे. शेतीत AI चा वापर करायला हवा. रयत शिक्षण संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना जनतेने देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असं शरद पवार यांनी म्हटले.

मराठा समाजातील मोठा वर्ग शेती करणारा आहे, मात्र शेतीतूनही प्रगती होत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हा पर्याय आहे. मात्र, हे करत असताना दोन समाजामध्ये कटुता वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी काही धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्याचे गरज आहे. आरक्षण देण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाचे काही निकष आहेत त्यानुसार 50 टक्के, 52 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. मात्र तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये 72 टक्के आरक्षण दिले आहे आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकले. केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *