यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील दहीगाव येथे इम्रान युनूस पटेल (२१, रा. दहीगाव) या तरुणाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांना यावल न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस या गुन्ह्याचे मूळ कारण शोधत आहेत आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल-विरावली रस्त्यावरील खारवा शिवारात शुक्रवारी रात्री इम्रान याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. यात ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) यांनी यावल पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती. आरोपींच्या कबुलीनंतर इम्रानचा मृतदेह खारवा शिवारात आढळून आला. इम्रानचे वडील युनूस पटेल यांच्या फिर्यादीवरून या दोन्ही तरुणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना रविवारी यावल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. जगताप यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन पुढील तपास करत आहेत. आरोपींच्या म्हणण्यानुसार, हा खून पैशाच्या वादातून झाला असला तरी पोलिस यामागे इतर काही कारणे आहेत काय? याचा शोध घेत आहेत. तर नेमके कारण काय? याबाबत उत्सुकता आहे



