Home » जळगाव » विद्यार्थ्यांशी बोलता बोलताच शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास !

विद्यार्थ्यांशी बोलता बोलताच शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास !

यावल : प्रतिनिधी

कधी काळी विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे शिक्षक एम.डी. नारखेडे यांची जीवनयात्रा त्याच ज्ञानमंदिरात संपली, जिथे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दहिगाव येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

एम.डी. नारखेडे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. ३३ वर्षात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, मूल्ये आणि शिस्त यांची पेरणी केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शाळेसाठी एक विशेष निधी उभारला, ज्याच्या व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बक्षीस दिले जाते. याच उद्देशाने फैजपूरहून बसने एकटेच दहिगाव येथे आले होते.

कार्यक्रम आदर्श विद्यालयाच्या सायन्स हॉलमध्ये पार पडत होता. ज्येष्ठ संचालक राजाराम महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नारखेडे सरांचा सत्कार झाला. प्रास्ताविक अजय पाटील व व्ही.बी. पाटील यांनी केले. नारखेडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत शिक्षकांना कर्मनिष्ठ राहण्याचा संदेश दिला. तेवढ्यात… बोलता बोलता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. बोलता बोलताच त्यांनी साऱ्यांचा अचानक निरोप घेतला. जिथे शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले, त्याच जागी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी संस्थेचे संचालक मनोहर वासुदेव महाजन, मधुकर बाजीराव महाजन, श्रीकृष्ण भुता पाटील तसेच मिलिंद नेहेते, किशोर गंभीर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे साक्षीदार असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *