Home » राष्ट्रीय » खा.नारायण राणे रुग्णालयात दाखल !

खा.नारायण राणे रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी केली जाणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नारायण राणे यांना अचानक रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणेंना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही राणे रुग्णालयात दाखल झाल्याबद्दल एक पोस्ट शेअर करत, ते लवकर बरे व्हावेस अशी प्रार्थना केली आहे. “ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे हे सुरुवातीला शिवसेनेचे नेते होते. शिवसेनेत असताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांचे दोन्ही मुले नीतेश राणे आणि निलेश राणे सध्या आमदार आहेत. नीतेश राणे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. नारायण राणे उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक मानले जातात.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *