जळगाव : प्रतिनिधी
जिह्यातील अनेक ठिकाणी गावठी पिस्तूलची वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 53 जवळ दोन संशयितांसह गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस तसेच मोटरसायकल मोबाईल असे एकूण 1 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल वरणगाव पोलींसानी जप्त केला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात संभाव्य दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत दोन संशयित इसमांना गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ₹१,२९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना बातमीदाऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकल (क्र. MP-68-ZC-3357) वरून वरणगाव शहरातील फुलगाव ब्रीजखाली गावठी कट्ट्यासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने येणार आहेत.
त्यानुसार त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून त्या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले. सदर पथकाने ठरलेल्या ठिकाणी सापळा रचून मोटरसायकल वरील दोघांना अडवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे – १) चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, ता. ब-हाणपूर, म.प्र.) २) पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी सांगितली. अंगझडती दरम्यान एक गावठी बनावटीचा पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, सदर पल्सर मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ₹१,२९,००० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर दोघांकडे कोणताही परवाना नसून ते बेकायदेशीररीत्या दहशत माजविण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगत होते. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९४/२०२५ अन्वये आर्म अॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. सोपान गोरे, पोलीस हवालदार यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रवि चौधरी, सचिन घुगे, आणि चालक पो.ह. भरत पाटील यांनी संयुक्तरित्या केली आहे.



