मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तुम्ही त्यांच्या नावाने एक जातीय राजकारण करत छत्रपती शिवाजी महाराज यांना खाली आणत आहात. समुद्रात महाराजांचे स्मारक उभारणार होतात त्यांचे काय झाले? शिवरायांची विचारसरणी सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे त्याला तुम्ही तिलांजली दिली आहे, आणि आपला राजकीय उदो उदो व्हावा म्हणून छत्रपतींच्या चरणी फुल वाहण्याचे चित्र आपण प्रसिद्ध करतात याची नोंद जनता घेत असते, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, हे राज्य मराठी माणसांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती जमाती आणि धर्म यांना हे स्वराज्य मिळवून दिले.त्या स्वराज्यासाठी सगळ्या जातीधर्म पंथाचे लोक महाराज यांच्यासोबत लढले आहेत. शिवराय सर्वाचे आहेत. अन्य देशात ही छत्रपती शिवरायांच्या युद्ध कौशल्याचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी काल जी जाहिरात करण्यात आली ती देणारा व्यक्ती कोण आहे. हा सर्व पैसा दोन नंबरची कामे करणाऱ्याचा असावा.
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रणाम करणे हे प्रत्येक मराठी माणसांचे कर्तव्य आहे. पण अजूनही भाजपचे लोकं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर फुल वाहत आहेत अशी जाहिरात बाजी करण्यात आली. ही जाहिरात कुणी दिली याचे नाव नाही. टीव्ही, वृत्तपत्र, बॅनर या जाहिरातीचा आम्ही काल अंदाज घेतला. तर हा खर्च 40 ते 50 कोटी रुपयांपर्यंत एका दिवसात खर्च झाले. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सुधारण्यासाठी हा खर्च करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे, आणि विश्वाचे दैवत आहेत. काल जी जाहिरात दिली ती भाजपच्या मूळच्या माणसाने दिलेली नाही. ती एका बाडग्याने दिली आहे. त्याने रा.स्व.संघाच्या कार्यालयात देखील शिवरायांचा फोटो लावावा. नागपुरातील संघ मुख्यालयात शिवरायाचा फोटो आणि पुतळा लावणे गरजेचे आहे. काल जाहिरातीसाठी कोट्यवधीचा खर्च केला आहे. काल 50 कोटी रुपये खर्च करणारा व्यक्ती नेमका कोण आहे हे समजले पाहिजे.
संजय राऊत म्हणाले की, ज्या व्यक्तीने जाहिरात दिली त्याने नाव दिले नाही याचा अर्थ असा आहे की हा संपूर्ण खर्च काळ्या पैशातून झालेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला सूचना दिल्या. भाजप मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या आणि 50 कोटीचा खर्च जाहिराती-वरती झाला. आता देवा भाऊ यांनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातील काही प्रतिस्पर्धी जाहिराती देतील. जाहिरातीची स्पर्धा यापुढे आपल्याला पाहायला मिळू शकेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं आम्हाला मान्य नाही.



