Home » राष्ट्रीय » नेपाळच्या इतिहासातील मोठा प्रसंग : लष्कराच्या गोळीबारात ९ जण मृत, ८० हून अधिक जखमी !

नेपाळच्या इतिहासातील मोठा प्रसंग : लष्कराच्या गोळीबारात ९ जण मृत, ८० हून अधिक जखमी !

काठमांडू : वृत्तसंस्था

नेपाळमध्ये सरकारविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, लष्कराच्या गोळीबारात ९ निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. ८० हून अधिक तरुण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे.

या आंदोलनाचं नेतृत्व १८ ते ३० वयोगटातील ‘जेन-झी’ पिढीतील तरुण करत असून, सोमवारी सकाळी संसद भवन परिसरात तब्बल १२ हजारांहून अधिक निदर्शकांनी धडक दिली. या गोंधळात संसदेत घुसखोरी झाल्याची घटना नेपाळच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. निदर्शकांनी संसद भवनाच्या गेट क्रमांक १ आणि २ वर कब्जा केल्याची माहिती मिळाली असून, त्यानंतर संसद परिसरासह राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात तात्काळ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. काठमांडू प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने “दिसताच गोळीबार” करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. या प्लॅटफॉर्मनी दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मंत्रालयाने यासाठी २८ ऑगस्टपासून सात दिवसांची मुदत दिली होती, जी २ सप्टेंबर रोजी संपली. सध्या काठमांडूमध्ये तणावपूर्ण शांतता असून, अधिकृत निवेदनासाठी सरकारकडून प्रतीक्षा केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *