Home » राष्ट्रीय » सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे (22) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या जाचाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असून पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

अधिकची माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील सोनाली बाळू वनवे या तरुणीचा जंबुरावस्ती येथील अनिकेत गर्जेसोबत दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी 5 लाख रुपयांची मागणी करायला सुरू केले. त्यानंतर सोनालीच्या घरच्यांनी पाच लाख रुपये सोनालीच्या सासरी नेऊन दिले. त्यानंतर तू मला आवडत नाही, मला तुझ्यासोबत राहायचे नाही, असे म्हणत सोनालीचा छळ सुरू झाला होता.

सोनालीने सासरचे लोक छळ करत असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली होती, पण हा त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता, सासरच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर, तलवाडा पोलिस ठाण्यात सोनालीचा पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तलवाडा पोलिस ठाण्यात पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वारंवार सुरू असलेल्या हुंडाबळीच्या घटनांमुळे यावर कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *