जळगाव : प्रतिनिधी
तरुण दोन दिवसांपासून शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल चौक येथे राहणारा २१ वर्षीय तरुण बेपत्ता होता. आज (शनिवार, दि. २० सप्टेंबर) सकाळी त्याचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव शेख अबूजर शेख युनूस (वय २१, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असे असून, तो गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. घरच्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र कुठेही काही माहिती मिळाली नाही. अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
आज सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान, नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी आलेल्या काही स्थानिक नागरिकांना मेहरूण तलावाजवळ पाण्यात एक तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो शेख अबूजरचा असल्याची ओळख पटली.
मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला व घातपाताचा संशय व्यक्त केला. अबूजरच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा आढळून आल्याची माहितीही सूत्रांकडून समजते, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या घटनेनंतर तांबापुरा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींना उघड करण्याची मागणी केली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज, कॉल डिटेल्स आणि स्थानिक माहितीच्या आधारे घटनास्थळाच्या आसपासची चौकशी केली जात आहे.



