जळगाव : प्रतिनिधी
मनपा कार्यालयातील सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग करणारा महानगरपालिकेच्या निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली. या प्रकारविषयी अगोदर महापालिकेत तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विजय घोलप याने लैंगिक छळ केल्याची लेखी तक्रार महिला डॉक्टरने मनपा आयुक्तांकडे केली होती. महिलेच्या केबिनमध्ये त्याचे येणे बंद झाल्यानंतर त्याने पीडित महिलेलाच त्याच्या केबिनमध्ये बोलावले व कार्यालयातील पाच ते सहा महिलांविषयी अश्लील टिप्पणी केली. त्यावेळी महिला निघून गेली. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा केबिनमध्ये बोलावून शरीरसुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेवर दबाब टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीची सदस्य म्हणून एका महिलेला डॉक्टरने पीडितेच्या घरी पाठवले. त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. मात्र, महिलेने खात्री केली असता सदर महिला ही समिती सदस्य नसल्याचे समजले.
फिर्यादीमध्ये पीडित महिलेने म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी रोजी डॉ. विजय घोलप हा पीडित महिला काम करत असलेल्या केबिनमध्ये आला व ‘भरणा करण्यासाठी येणारे लोक तुम्हाला वाईट नजरेने पाहतात, तुम्ही माझ्या केबिनमध्ये शिफ्ट व्हा’, असे सांगू लागला. त्यावर महिलेने नकार दिला. त्यानंतरही तो सतत महिलेच्या केबिनमध्ये येऊन गैरवर्तन करू लागला. या प्रकाराविषयी महिलेने महापालिकेत तक्रार केल्यानंतर डॉ. घोलप याने कार्यालयातील पाच जणांना महिलेच्या घरी पाठवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकला. इतकेच नव्हे पीडितेच्या पतीच्या कार्यालयातही जाऊन धमकी देत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे फिर्यादीत म्हटले.


