Home » राष्ट्रीय » ‘त्या’ सुसाईट नोटची पडताळणी सुरु : चौकशी होवून कारवाई होणार ?

‘त्या’ सुसाईट नोटची पडताळणी सुरु : चौकशी होवून कारवाई होणार ?

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनक येथे १४ रोजी मध्यरात्री घडलेल्या हॉटेल चालकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेल भाडेतत्त्वावर चालवणारे आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी मध्यरात्री १२.३० ते १ दरम्यान हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गळफास लावून आपले जीवन संपवले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी आशिष फिरके यांनी एक सुसाईड नोट लिहून ती आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर अपलोड केली होती, त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. आशिष फिरके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्यानुसार, ते गेल्या तीन वर्षांपासून हॉटेल रोनकचे भाडेकरू म्हणून व्यवसाय करत होते. तीन वर्षांचे करारनामे असूनही, जागेच्या मालकाने अचानक हॉटेल खाली करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच, मालकाच्या मुलाकडून वारंवार धमक्या मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. या सातत्याने सुरू असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि संबंधित सुसाईड नोट जप्त करून फॉरेन्सिक विभागाकडे पाठवली आहे. १६ रोजी दुपारी फॉरेन्सिक पथकाने हॉटेलमध्ये तपास करून पुरावे संकलित केले. सुसाईड नोटमधील मजकूर व हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

परिसरात संतापाची लाट

या प्रकारामुळे रिंगरोड परिसरात संतापाचे वातावरण आहे. व्यावसायिकांनी अशा प्रकारच्या त्रासाला बळी जाऊन आत्महत्या करावी, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित जागा मालक व त्याच्या मुलाविरुद्ध योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *