Home » जळगाव » अवैध गॅस भरताना स्फोट; जामनेर पोलिसांकडून कारवाई सुरू

अवैध गॅस भरताना स्फोट; जामनेर पोलिसांकडून कारवाई सुरू

जामनेर : प्रतिनिधी

जामनेर शहरात बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या गॅस भरण्याच्या व्यवसायामुळे मोठा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चारचाकी वाहनात गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला आणि काही वेळ परिसरात अफवांचीही गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत ही गॅस भरणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी संबंधित दुकानदार व गॅस भरणाऱ्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गेल्या काही महिन्यांपासून शहरात अशा अनेक ठिकाणी अवैध गॅस भरणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील अशा अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *