पुणे : प्रतिनिधी
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री पुणे-सातारा रोडवरील केके मार्केट ते चव्हाणनगर मार्गावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणीच्या कानशिलात जोरात मारताना दिसतो. त्यानंतर तिच्या कंबरेत आणि पोटात लाथा घालतो. मारहाणीनंतर तरुणी जवळ उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसते, मात्र पुन्हा बाहेर येते आणि रस्ता ओलांडताना तोच तरुण पुन्हा तिच्यावर हल्ला करतो. ही घटना नागरीकांच्या उपस्थितीतच घडली, मात्र कोणीही मध्यस्थी केली नाही, हे विशेष म्हणजे धक्कादायक आहे.
ही घटना घडल्यानंतरही उशिरापर्यंत कोणतीही तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली नव्हती. सहकार नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली असून, दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिस व्हिडिओच्या आधारे तपास करत आहेत. सध्या देशभरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवीची उपासना सुरू असताना, पुणे शहरातच महिला असुरक्षित असल्याचे विदारक वास्तव या घटनेतून समोर आले आहे. सोशल मीडियावर नागरिक ‘हीच का स्मार्ट सिटी?’ असा सवाल उपस्थित करत असून, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.



