जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून जवळ असलेल्या बोगस कॉल सेंटर सुरु करण्यासंदर्भात गुन्हा दाखल असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांची जून महिन्यामध्येच संशयितांसोबत बैठक झाल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबईतून हे केंद्र हाताळणाऱ्या तिघांपैकी इम्रान अकबर खान (रा. मुंबई) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केले आहे. विविध आमिषे दाखवून इंग्लंडसह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे केंद्र हाताळणारा अकबर व त्याचा मित्र ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (रा. मुंबई) हे या पूर्वी अशाच प्रकारचे फसवणुकीचे रॅकेट हाताळत असल्याचीही माहिती समोर आली आहे. या दोघांसह आदील सैयद निसार अहमद सैयद या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. अटक केलेला इम्रान खान हा या पूर्वीच जळगावात येऊन गेला आहे. हे केंद्र मुंबई येथून चालविणारे आदील, अकबर, इम्रान यांचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईला गेले होते. तिघांपैकी इम्रान अकबर खान याला पोउनि शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतून अटक करून जळगावात आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता ७ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्या एल.के. फार्मवर हे बोगस कॉल सेंटर सुरू होते तेथे अधिकृत वीजपुरवठादेखील नसल्याची माहिती समोर येत आहे.
गुन्हा दाखल असलेला अकबर याची ललित कोल्हे यांच्यासोबत जुहू येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ओळख झाली होती. अकबर हा त्यापूर्वीपासूनच आदीलसोबत असे काम करत असल्याने त्याला अशा कॉल सेंटरच्या कामकाजाविषयी माहिती होती. जळगावात असे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी अकबर, आदील, इम्रान व राकेश अगारिया यांच्यासोबत ललित कोल्हे यांची जून महिन्यात बैठक झाली. त्यानंतर कोल्हे यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये कामे केली.
जळगावातील बोगस कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याने कोणत्या देशात किती कॉल झाले व किती जणांची फसवणूक झाली, याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. ज्या देशातील नागरिकांची फसवणूक झाली, त्या देशांच्या दूतावाताशी संपर्क साधला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष कोल्हे याचाही पोलिसांनी जबाब घेतला आहे. या प्रकरणाविषयी त्याला काही माहिती आहे का, याविषयी त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. १ ऑक्टोबरला संध्याकाळी ललित कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्यांची अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी चौकशी केली. या प्रकरणात मिनाफ हुसेन नदाफ, योहेश हिसारिया, सैयद मोहंमद मुदसीर उल हसन यांचाही सहभाग असण्याविषयी नावे निष्पन्न झाली होती. ते यात सक्रीय होते, हेदेखील तपासात समोर आले आहे.



