Home » महाराष्ट्र » उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचविले ; मुख्यमंत्र्यांनी केले होते आवाहन !

उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचविले ; मुख्यमंत्र्यांनी केले होते आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे यांच्या विकासाच्या मुद्यावर कोणताही उहापोह झाला नाही. त्यामुळे माझे 1 हजार रुपये वाचले, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला. उद्धव ठाकरे यांचा गुरूवारी दसरा मेळावा झाला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. मी मुख्यमंत्री असताना कोरोना महामारी आली होती. त्यावेळी केलेल्या कामामुळे मी देशातील एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. आत्ताही मुख्यमंत्र्यांच्या कामांची यादी जाहीर झाली आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर असून, फडणीस हे 10 व्या क्रमांकावर फेकले गेलेत, असे ते म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन. त्यांनी माझे 1 हजार रुपये वाचवले. मी आवाहन केले होते की, उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि 1 हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचे भाषण ऐकले नाही. पण त्यांच्या भाषणानंतर मी त्यांचे भाषण ऐकलेल्या काही पत्रकारांना विचारले की, माझ्या 1 हजार रुपयांना काही फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? पण उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात विकासाच्या मुद्यावर कोणतेही भाष्य केले नाही. ते बोलूही शकत नाहीत. ते केवळ अद्वातद्वा बोलतात. त्यांचे बोलणे हे स्वगत असते. यावेळी परिस्थिती अशी होती की, पुढे माणसेही नव्हती. त्यांचे स्वगत होते. पण तरीही त्यांचे आभार मानतो की, त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसे करणार? राज्याला पुढे कसे नेणार? बीएमसीला पुढे कसे नेणार? याविषयी अवाक्षरही न काढता, मी जे बोललो ते सत्य करून दाखवले. त्यांनी माझे 1 हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात फडणवीसांवर निशाणा साधताना म्हणाले होते, राज्यातील शेतकरी हताश झाला आहे. तो स्थितीचा निकराने सामना करत आहे. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास संपला नाही. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तेथील महिलांच्या खात्यांत प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राविषयी असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *