Home » जळगाव » वाळू माफियांनी घातला वाद अन तलाठ्याला केली धक्काबुक्की

वाळू माफियांनी घातला वाद अन तलाठ्याला केली धक्काबुक्की

पाचोरा : पतीनिधी

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ही घटना अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथे रविवारी सायंकाळी घडली. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक ऊर्फ भावड्या वसंत पाटील, हिरालाल निंबा पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल बापूराव पाटील, पुनगावचे तलाठी तेजस रोहिदास बन्हाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता.

पथक तिथे पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले. त्याठिकाणी ६४ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *