Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : माजी आ.धंगेकरांवर होणार पक्षातून हकालपट्टीची कारवाई !

मोठी बातमी : माजी आ.धंगेकरांवर होणार पक्षातून हकालपट्टीची कारवाई !

पुणे : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घटना घडत असताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत धंगेकरांनी महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण केल्याचा आरोप होत असून, त्यामुळेच धंगेकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कात्रजमधील गोळीबार प्रकरणात भाजप नेत्यांना जबाबदार धरणे, या पार्श्वभूमीवर धंगेकरांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजप नेते नाराज झाले होते. त्यामुळे पुण्यातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धंगेकरांविरोधात तक्रार दाखल केली. भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय झाल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी भाजपसोबतची युती टिकवून ठेवण्यासाठी धंगेकरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातच शिंदेंनी धंगेकरांना “महायुतीमध्ये वाद नको” अशी जाहीरपणे समज दिली होती. मात्र, तरीही धंगेकरांनी भाजप नेत्यांवर टीका करणे थांबवले नाही. भाजपच्या अंतर्गत चर्चेनुसार, धंगेकर हे काँग्रेसकडून पाठवलेले ‘हस्तक’ असून, संजय राऊत त्यांना ‘हँडल’ करत असल्याचाही आरोप आहे.

दुसरीकडे, आपल्यावर संभाव्य कारवाई होणार याची कुणकुण लागताच रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट केले आहे. रवींद्र धंगेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचे नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.

आणि पुन्हा एकदा सांगतो….. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली, तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *