धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ रीलच्या नादात दोन तरुणांना आपला जीव गमावा लागला आहे. मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावं प्रशांत पवन खैरनार (वय 18 वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय 18 वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते. पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ दोघे तरुण रेल्वे ट्रॅकवर रील तयार करत होते. यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे व साहसी कृत्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
सदर घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे पाळधी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.



