जळगाव : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक निवडणूक होण्यापूर्वी अनेक जिल्ह्यात भाजप महाविकास आघाडीला धक्के देत असताना जळगाव शहरात देखील महाविकास आघाडीला भाजपने धक्का देत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते माजी महापौर नितीन लढा, माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह अनेक नेत्यांचा कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला महानगरपालिकेत सत्तेसाठी विरोधकांना पक्षात प्रवेश मिळवून द्यावाच लागला हे निश्चित झाले आहे.

जळगाव मनपाच्या सन 2019 मध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवून महापौर पद मिळवले होते तर अनेक भाजपच्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली होती मात्र अडीच वर्षानंतर भाजपमधील नव्या नगरसेवकांनी एक गट बनवत भाजप पक्षातून बंडखोरी करून ठाकरेंसोबत सत्ता स्थापन केली आणि तेव्हा जयश्रीताई सुनील महाजन यांना महापौर पदाची संधी मिळाली मात्र आता सन २०२५ च्या मनपा निवडणुकीपूर्वीच भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांना आपल्या पक्षात घेऊन सत्तेसाठी एकत्र आल्याचे चित्र सध्या दिसत आहे मात्र त्यामुळे भाजपासाठी अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदाच्या निवडणुकीत देखील आयात केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करावा लागणार हे मात्र निश्चित.
जळगाव शहर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून भाजपची सत्ता यावी यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कित्येक वर्ष पक्षासाठी काम केले आहे मात्र आता त्याच कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देऊन ठाकरेंच्या माजी महापौरांना व भाजपवर नेहमीच गंभीर आरोपांसह टीकाटिपणी करणाऱ्या दोन माजी महापौरांना भाजप नेत्यांनी प्रवेश देऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची केली आहे.



