मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी तब्बल 2 महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी दखल घेत संजय राऊतांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काळजी घे संजय काका, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना तब्येत जपण्याचा सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनीक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही ते म्हणाले. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गट चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांना ‘गेट वेल सुन’चा संदेश दिला आहे.
काळजी घे संजय काका!
आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, काळजी घे संजय काका. प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, खात्री आहे. आदित्य यांच्या या पोस्टला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. धन्यवाद, माय डियर आदित्य, असे ते म्हणालेत. उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल एका पोस्टद्वारे संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली होती. संजय राऊत जी, लवकरात लवकर बरे व्हा. मी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनीही त्यांचे आभार मानले होते. आदरणीय पंतप्रधान धन्यवाद. माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, असे ते म्हणाले होते.
एरवी संजय राऊत यांच्यावर एकेरी शब्दांत टीका करणाऱ्या मंत्री नीतेश राणे यांनीही संजय राऊत यांना बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत जी काळजी घ्या. लवकर बरे व्हा, असे ते म्हणालेत.



