जळगाव : प्रतिनिधी
वृत्तपत्राच्या कार्यालयात जात असलेल्या पत्रकारावर दूचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन जणांनी बियरची रिकामी बाटली मारुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठ परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका वृत्तपत्रामध्ये वरीष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत असलेले दीपक चिंतामण कुलकर्णी (वय ४१, रा. धानोरा, ता. चोपडा) हे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतील कार्यालयात पायी जात होते. यावेळी मागून दुचाकीवर तीन जण आले. त्यातील एकाने त्याच्या हातातील बियरची रिकामी बाटली कुलकर्णी यांच्या डाव्या कानाजवळ गालावर फोडली. त्यामुळे त्यांच्या गालावर गंभीर दुखापत झाली. यावेळी दुसऱ्याने फुटलेली बाटली पोटात मारण्यास सांगितले. तो वार कुलकर्णी यांनी हात आडवा करुन चुकवला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीने पसार झाले. जखमी झालेल्या कुलकर्णी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल इंदल जाधव हे करीत आहे.



