जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित हल्लेखोर राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५) आणि त्याची पत्नी मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) यांना पोलिसांनी नांदूर गावाजवळून पकडले. या घटनेत एक कामगार ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील फिरोज शेख, राजन शेख आणि इतर काही मजूर एमआयडीसीतील विजेते कंपनीत काम करतात. कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून, तो तेथे अवैधरित्या दारू विक्री करीत होता. रविवारी रात्री १० वाजता सरफू अहमद हा पुडी घेण्यासाठी गेला असता, राहुलने त्याला मारहाण केली. कंपनीतील कामगार त्याला समजविण्यासाठी गेले असता, राहुलची पत्नी मोनाली स्कुटरवर घटनास्थळी आली आणि तिने राहुलच्या हातात गावठी पिस्तुल दिले.
यानंतर राहुलने गोळीबार करून राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख यांना गंभीर जखमी केले. गोळी राजनच्या किडनीजवळ लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. गोळीबारानंतर दाम्पत्य घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की ते दुचाकीवरून नांदूराच्या दिशेने जात आहेत. पोलिसांनी सापळा रचून नांदूरा चौफुलीजवळ दोघांना जेरबंद केले.
हल्लेखोर राहुल बऱ्हाटे याच्याविरुद्ध ८ ते १० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्यावर पूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, शशिकांत मराठे, किरण पाटील आणि गिरीष पाटील यांनी केली.



