Home » महाराष्ट्र » अजित पवारांचा राजीनामा घेण्यासाठी लढू ; सुषमा अंधारेंची इशारा

अजित पवारांचा राजीनामा घेण्यासाठी लढू ; सुषमा अंधारेंची इशारा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून आणि अल्प किमतीत ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अंदाजे हजारो कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतली, असा दावा केला जात आहे. ही जमीन Amadea Holdings LLP या कंपनीने खरेदी केली असून, या कंपनीचे संचालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील असल्याचे वृत्त समोर आले आहे.

भूमी तज्ज्ञांच्या मते, ही महार वतनाची जमीन असल्याने तिची विक्री कायद्याने अशक्य आहे. त्यामुळे ही जमीन कशी विकली गेली आणि महसूल विभागाने यास कशी परवानगी दिली, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्यवहाराची कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रिया तपासण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडूनच असे प्रकार होत असतील, तर सामान्य माणसाने सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची?” त्यांनी स्पष्ट सांगितले की, “गोरगरिबांसाठी असलेली जमीन मोठ्या लोकांनी हडप केली असेल, तर हा गंभीर आणि निषेधार्ह प्रकार आहे.”

अंधारे पुढे म्हणाल्या, “२१ कोटींचा महसूल बुडवणे म्हणजे सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी कर भरायचा आणि सत्ताधाऱ्यांच्या घराण्यांना सूट द्यायची, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ज्या चिरंजीवांनी व्यवहार केला, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी लढू.”

या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कोरेगाव पार्क परिसर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणाची महसूल आणि उद्योग विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. या आरोपांमागे किती तथ्य आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल; मात्र या घडामोडीनंतर राज्यभरात ‘पवार कुटुंब आणि जमीन व्यवहार’ हीच चर्चा रंगली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *