Home » महाराष्ट्र » “पार्थ पवार जमीन प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल !

“पार्थ पवार जमीन प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल !

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच, प्राथमिक चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे आहेत. कुठेही अनियमितता आढळल्यास दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री अशा गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही.”

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क येथील तब्बल 1,800 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार फक्त 300 कोटी रुपयांत केला असून, यासाठी फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. एवढेच नव्हे तर फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफी आणि 27 दिवसांत व्यवहार पूर्ण झाल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

या घडामोडींनंतर विरोधकांनी पार्थ आणि अजित पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरकार या प्रकरणात कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *