पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ ४ तासांतच चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्यास जेरबंद केले. तसेच चोरी गेलेली दुचाकीही हस्तगत केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोजे चिंचपुरे येथील मेडिकल व्यावसायिक मनोज डिगंबर जाधव (वय ३०) यांनी ४ नोव्हेंबरला दुपारी जारगाव चौफुली येथे त्यांची बजाज प्लॅटीना ही काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १९, सीपी ०८६९) लावली. त्यानंतर ते फळ घेण्यासाठी निघून गेले. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. या घटनेबाबत मनोज जाधव यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ. योगेश पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकों गणेश कुवर व पोकॉ श्रीराम शिंपी यांनी हातात घेतला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हेगाराचा शोध घेत असताना संशयित व्यक्ती हा कृष्णापुरी परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील भगवान लक्ष्मण पाटील (वय ३५) यास ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे ४५ हजारांची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करत आहेत.



